मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदेनी 40 आमदारांसह बंड पुकारल्यानं राज्यातील आख्खी शिवसेना खिळखिळी झाली. त्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी, आणि झालेल्या पडझडीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुलवण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मैदानात उतरणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने मुंबईतल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा ज्यामध्ये शाखाप्रमुख, विभागप्रमुखांचा मोठा मेळावा नेस्को मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. गणेशोत्सव सोहळा पार पडताच हा मेळावा होणार आहे. तशी माहिती उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे.
ज्या ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं, त्यांच्याच बालेकिल्ल्यातून म्हणजे ठाण्याच्या टेंभी नाक्याच्या मैदानात उद्धव ठाकरे पहिली सभा घेणार आहेत. आता थेट मैदानी सभांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवरुन उद्धव ठाकरे शिंदेंना ललकारणार आहेत.
सध्या सणवार सुरु होतायेत. दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे महाराष्ट्र दौरा सुरु करेन. पण त्याअगोदर मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा नेस्को मैदानावर मेळावा, नंतर शिवाजी पार्कावर दसरा मेळावा आणि नंतर महाराष्ट्र दौरा करेन. सध्या त्याच अनुषंगाने समिकरणांची जुळवाजुळव करतोय, असं उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.