मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) 2014 ते 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील युती सरकारच्या काळात विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवं वळण लागलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेना नेत्यांनी दुजोरा दिला. यावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून या सर्व विषयावर बाजू मांडण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीतील काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते व तेव्हाही त्यांच्या मनात वेगळा विचार होता. 15-20 आमदारांसह येतो, उपमुख्यमंत्री पदासह गृह खातं द्या अशी मागणी केली होती, असं ठामपणे सांगणारे प्रत्यक्षदर्शी अनेक लोक आजही त्यांच्या अवतीभोवती आहेत.
तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली माहिती भाजपच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिली होती. त्यावेळी ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असं त्यांना वाटलं नव्हत का? असा सवाल करण्यात आला आहे. आता शिंदे हे फक्त ईडीच्या भीतीने भाजपमध्ये गेले आहेत. कारण ठाणे महापालिका, समृद्धी महामार्ग, नगरविकास खाते या माध्यमांतून पैसाच पैसा. त्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा, या दुष्टचक्रात दे पूर्णपणे अडकले आहेत. मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणे वेगळे व लालसा असणे वेगळे. शिंदे हे लालसेचे बळी ठरले आहेत, असा आरोप शिवसेनेने सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर केला आहे.