नागपूर | Uddhav Thackeray – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “विधानसभेत दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात विरोधकांनी घाम फोडला आहे. विरोधकांनी राजीनाम्यांच्या मागण्या केल्या, सभागृहाबाहेर आंदोलनं केली. मात्र अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनमा घेतला नाही. सरकारनं प्रकरणांचं गांभीर्य लक्षात घेत राजीनामे घेतले पाहिजेत”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
“काल शिवसेना कार्यालयात मिंद गट गेले होते. आज आरएसएस कार्यालयात गेले. तिथेही ते ताबा सांगायला गेले होते का? सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांचे मंत्री, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार पाहून महाराष्ट्रात टोळीचं राज्य आलं का अशी भावना जनमानसात आहे. शिंदेची वृत्ती घाणेरडी असून आरएसएसने काळजी घ्यावी. भागवतांनी देखील कार्यालयात कुठे लिंबू टाकले का पाहावं”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) टोला लगावला.
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी केली. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “भाजप नेत्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपच्या पोटातील डाव आहे. भाजपच्या हातात मुंबई गेली तर घात कसा करणार हे समोर आलं आहे”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे. तर आजपर्यंत मुंबई कोणामुळे सुरक्षित आहे हे मुंबईकरांना माहिती आहे, असंही ते म्हणाले.