बुलढाण्यात सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार; तारीख निश्चित, ‘या’ दिवशी घेणार शेतकरी मेळावा

मुंबई | Uddhav Thackeray – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं जोमानं कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी कालपासून (31 ऑक्टोबर) मातोश्रीवर मॅरेथाॅन बैठकांना सुरूवात केली आहे. यामध्ये आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. तसंच या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहेत.

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून शिंदे सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसंच विधानसभा अधिवेशनाच्या आधी ठाकरेंचा होणारा हा मेळावा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. यादरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावून घेतलं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तसंच 23 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली. तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Sumitra nalawade: