मुंबई | Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसंच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असं देखील ठाकरे म्हणाले. ते शनिवारी (30 जुलै) मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.”
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत त्यांचा आपल्याला अनुभव आहे. आज मात्र त्यांनी कहर केलाय. महाराष्ट्राची जगाला ओळख आहे, पण राज्यपालांना नाही याची खंत आहे. मुंबई ही हक्काने मिळवली आहे, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारांनी मुंबईवर लिहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रासाठी 105 नव्हे, तर 200-250 लोकांनी बलिदान दिलं आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लॉकडाऊन असतानाही सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घाई झाली होती. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी त्यांनी हिणकस उद्गार काढले होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे.”