उजनी बनतेय समृद्ध जैवविविधतेचे तीर्थक्षेत्र

सोलापूर : उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात दरवर्षी देशी-विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी देशभरातील पक्षीप्रेमी दरवर्षी उजनीला भेट देतात. उजनीचा हा परिसर पक्ष्यांचे माहेरघर बनल्याने भविष्यात पक्षी पर्यटनातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. उजनी धरणाच्या १४ हजार चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रावर परदेशातून हजारो मैल प्रवास करून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी उजनी तीर्थक्षेत्र बनले आहे. उजनीचे बॅकवॉटर पक्षी अभयारण्य घोषित करून ठिकठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्रे तयार करणे आवश्यक आहे. उजनी जलाशयाच्या करमाळा तालुक्यातील कोंढार-चिंचोली, टाकळी, खातगाव, कात्रज, वांगी, कुंभारगाव, डिकसळ या परिसरात उपलब्ध होणारे खाद्य, जलाशयातील मासे, वनस्पतीचे बी, फळे, देठे, पाने व खोड, शेवाळ यावर अनेक पक्षी अवलंबून आहेत.

सुमारे २५० हून अधिक प्रजातींपैकी बहुतांशी पक्षी वर्षभर उजनी जलाशयाच्या परिसरात आढळतात. उजनी जलाशय स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांचेही आकर्षण ठरले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी जसजसे कमी होत जाते, तशी उथळ भागात दलदल तयार होते. या दलदलीत शेवाळ वाढते. त्यात अळ्या, किडेही असतात. हेच मुख्यत: पक्ष्यांचे अन्न. धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होत जातो तसतशा घटत्या पाण्याच्या क्षेत्रात ज्या दलदलीच्या जागा तयार होतात, त्यांना पाणथळ जागा म्हटले जाते. या उथळ पाण्याच्या जागा पक्ष्यांना खाद्य मिळण्यासाठी अनुकूल असतात. शिवाय पाण्यात त्यांना मासेही मिळतात. उजनी धरणाचा पसाराच मोठा असल्याने अशा पाणथळ जागा तेथे मोठ्या प्रमाणात तयार होतात. या पाणथळ जागेत समृद्ध जैवविविधता दडलेली आहे. त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

Nilam: