पुणे : ढोल-ताशाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात पुण्यातील २५ हजारांहून अधिक युवक-युवती एकत्र येतात. यंदादेखील कोविड संकटानंतर दोन वर्षांनी एकत्र आलेल्या वादकांपैकी १७५ भगव्या ध्वजधारकांनी ढोल-ताशांच्या तालावर ध्वज नाचवीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अनोखी मानवंदना दिली. रणी फडकती लाखो झेंडे… या गीताचे समूहगान करीत वादकांनी स्वातंत्र्याचा जयजयकारदेखील केला.
भगवे ध्वज नाचवीत असताना ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुण्यातील विविध पथकांतील ध्वजधारकांचे एकत्रित ध्वज प्रशिक्षण व प्रात्यक्षिकदेखील पार पडले. ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्रतर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पराग ठाकूर म्हणाले, की ढोल-ताशा पथकाच्या अग्रभागी ध्वजपथक असते. ध्वजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ढोल-ताशा पथकातील प्रत्येक वादक ध्वजाला वंदन करूनच वादनाला प्रारंभ करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा ध्वजासह भगव्या ध्वजाचे महत्त्व व इतिहासदेखील वादकांना समजावा, याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मर्दानी खेळांचे सादरीकरण देखील झाले.