नवी दिल्ली : (UPA Vice President Candidate Alliance Margaret Alva) शनिवार दि. १६ रोजी झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. बैठकीनंतर उपराष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वतीने जगदीप धनकड हे उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली.
दरम्यान, (युपीए) संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी रविवार दि. १७ रोजी उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे. युपीएकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केलं आहे. मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील १७ पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.