उपक्रमशील शाळा: दप्तराविना मुलांतील खेळाडू वृत्तीला चालना

मज आवडते मनापासुनी शाळा लावीते लळा जसा माऊली बाळा या उक्तीप्रमाणे बापूसाहेब पवार प्राथमिक शाळा, 380 भवानी पेठ पुणे 42 ही आहे. तर पुण्यश्लोक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

संस्थेची स्थापना 22 फेब्रुवारी 1961 रोजी झाली आहे. श्रीमंत बापूसाहेब पवार यांनी पूर्व भागातील मुलींसाठी शाळा सुरू केली. त्या शाळेचे ब्रीदवाक्य ‘कर्तव्यासाठी अविरत झटा’ हे असून याप्रमाणे खरोखरच विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी, त्यांनी भरपूर अभ्यासासाठी कष्ट करावेत आणि अभ्यासाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्या शाळेतील शिक्षिका वेगवेगळे उपक्रम घेत असतात आणि उपक्रमातून अभ्यास शिकविला जातो. यामध्ये आठवड्यातील शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविला जातो. म्हणजेच एक दिवस दप्तर आणायचं नाही आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खेळ घ्यायचे. यामुळे मुलांतील खेळाडू वृत्तीला चालना मिळते.

तसेच गणितातील पाढे शिकवताना गाण्यातून पाढे घेणे व त्यावर तालबद्ध खेळ घेणे हा उपक्रम देखील मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने राबवला जातो. तर विद्यार्थ्यांचे उच्चार सुधारावेत म्हणून संस्कृत मधून गणपती अथर्वशीर्ष घेतले जाते, रामरक्षा शिकविली जाते. चालीत विद्यार्थी पाठांतर करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंद वाटतो. त्यामुळे उपस्थिती वाढते व पटसंख्या वाढण्यासाठी त्याची मदत होते. वेगवेगळे सणसमारंभ देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

या सणांमध्ये प्रवेशोत्सव पालखी सोहळा, नागपंचमी, शिवजयंती, दिवाळी, दसरा, ईद, नाताळ, असे सर्व दिनविशेष घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांची ओळख होते. लहान वयातच भारतीय संस्कृती आणि सणाची गोडी निर्माण होते. अशी उपक्रमशील शाळा असेल तर नक्कीच खेळाडू वृत्तीचे विद्यार्थी घडतील.

Dnyaneshwar: