मणिपूरवरून गदारोळ…

आप खा. संजय सिंह यांचे निलंबन

नवी दिल्ली | Manipur Case – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

मणिपूरच्या मुद्द्यावर सभापती जगदीप धनखड यांच्याशी वाद घातल्याबद्दल आप खासदार संजय सिंह यांना राज्यसभेतील पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभापतींच्या खुर्चीजवळ जाऊन संजय सिंह वाद घालत होते. धनखड यांनी त्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्यास सांगितले, परंतु संजय सिंह यांनी तसे केले नाही.

धनखड यांनी सरकारला संजय सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यास सांगितले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. यानंतर जगदीप धनखड यांनी संजय सिंह यांच्यावर कारवाई केली.

मी सदनात या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. परंतु, मला कळत नाही की, विरोधी पक्ष यावर चर्चा का करू देत नाहीत. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी या विषयावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील विषयाचे संपूर्ण सत्य देशासमोर आले पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे.
— अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आम्हीसुद्धा चर्चेसाठी तयार आहोत. परंतु यावर पंतप्रधानांनी त्यांचे म्हणणे मांडावे. जर 140 कोटी जनतेचा नेता बाहेर पत्रकारांशी बोलत असेल आणि 140 कोटी जनतेचे प्रतिनिधी सदनात बसलेले असतील तर तुम्ही इथेही तुमचे मत मांडावे.
— मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

admin: