पुणे : पुणे शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. त्या गावांना विकासकामांसाठी जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) आणि शिक्रापूर व सणसवाडी (ता. शिरूर) या गावांचा नगरपंचायतीत तर हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे रुपांतर नगरपरिषदेत करावे अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी केली आहे.
अशोक पवार यांनी प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वरील विषयासंबंधित मंगळवारी (ता. १७) निवेदन दिले आहे. हवेली तालुक्यातील उरुळीकांचन ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजार ३०५, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची लोकसंख्या १९ हजार ३२९, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २२ हजार ५१८ आहे. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २० हजार २६३ तर सणसवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या १३ हजार ५४३ आहे. या ५ गावांमध्ये मोठया प्रमाणात नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे या ५ गावांच्या विकासासाठी नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले पाहिजे. असे निवेदनात म्हटले आहे.
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आमदार पवार यांनी सांगितले आहे.