शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईची भीती राज्यातील धरणांत फक्त ‘एवढे’ टक्के पाणीसाठा

मुंबई : पावसाळा सुरू व्हायला अजून महिना बाकी आहे. त्याचबरोबर राज्यातील धरणांमध्ये जवळपास ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक (Water Level In Maharashtra) आहे. विशेष म्हणजे पुणे विभागात सर्वात कमी उपलब्ध पाणीसाठा केवळ २८.८३ टक्के असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात या भागातील उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वाढत असल्याने आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याची चर्चा आहे. (Available Water in Maharashtra)

राज्यात सध्या १३९ मोठ्या, २५९ मध्यम आणि २६०५ लहान अशा एकूण ३००३ धरणांमध्ये मिळून एकूण २२३५०.१४ दशलक्ष घनमीटर (७८९ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण ३६.६४ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ३७.३९ टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यातच यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची आवश्यकता असल्याचे देखील बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक गाव आणि वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे. तर सध्या राज्यातील २३५ गावात आणि ६०६ वाड्यावर एकूण १८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात ४३ शासकीय आणि १४१ खाजगी टँकरचे समावेश आहे. तर मुंबई विभागात १०० (Mumbai Water level), नाशिक विभागात ३७ (Nashik Division Water level), पुणे विभागात २६ (Pune Division Water Level), छत्रपती संभाजीनगर ५ (Chhatrapati Sambhajinagar Division Water Level), अमरावती विभागात १६ (Amaravati Division Water level) टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती…

सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येते.
छत्रपती संभाजीनगर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण ४१.७५ टक्के आहे.
कोकण विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण ४०.९२ टक्के आहे.
नागपूर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण ४१.६३ टक्के आहे.
नाशिक विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण ३९.५८ टक्के आहे.
पुणे विभागात धरणांची संख्या जादा आहे, पण २८.८३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे विभागात पाणीसाठ्याची टक्केवारी कमी…

राज्यात सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण ३६.६४ टक्के असून, गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ३७.३९ टक्के होता. मात्र पुणे विभागात पाणीसाठ्याची टक्केवारी सर्वात कमी आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण ७२० धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज ७५२७.८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण २८.८३ टक्के आहे.

Dnyaneshwar: