पुणे : उत्कर्ष प्रकाशनातर्फे शहाजीराव बलवंतलिखित वंदना या ग्रामीण कादंबरीचे प्रकाशन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले. यावेळी राम गायकवाड (माजी सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा), अरुण खोरे (वरिष्ठ पत्रकार), प्रा. शिरीषकुमार तारापूरकर, शैलजा बलवंत, डॉ. बाळासाहेब बलवंत (उपप्राचार्य, दहिवडी कॅालेज, दहिवडी) व उत्कर्षचे सु. वा. जोशी उपस्थित होतेअध्यक्षीय भाषणात चंद्रकांत मोकाटे यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणार्या ‘वंदना’ या कादंबरी लिखाणाबाबत शहाजीराव बलवंतांचे कौतुक केले.
ते म्हणाले, ‘वंदना ही माणमातीचा गंध असणारी एक आशयसंपन्न समकालीन सामाजिक व कलात्मक उंची प्राप्त केलेली कादंबरी आहे. या कादंबरीत माणदेशी व मराठी बाणा वाचावयास मिळतो.’
बाळासाहेब बलवंत म्हणाले, ‘दैनंदिन जीवनात येणारा जातीव्यवस्थेचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या विषम परिस्थितीवर मात करणार्या वंदनाचा संघर्ष वाचकांना खिळवून ठेवणारा आहे. शहाजीराव बलवंत यांनी शिक्षणाचा अभाव, पारंपरिक आर्थिक व सामाजिक दारिद्य्र असणार्या मागास वस्तीतील लोकांच्या जीवनाचे चित्रण हुबेहूब केले आहे. दारिद्य्र अनुभवलेली वंदना, ग्रामीण भागात जन्मलेली वंदना ते आय. ए. एस. उच्चशिक्षित झालेली वंदना, अशी पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीला दारिद्य्र, असमानता आणि जातीव्यवस्थेचा कटू अनुभव असे अनेक पदर आहेत.
अगदी आय. ए. एस. झाल्यानंतरही तेच अनुभव तिच्या वाट्यास येतात. खेड्यातले वातावरण व तिथले अजूनही जातीपातीचे विष, त्याची रुजलेली पाळेमुळे अधोरेखित करण्याचा प्रयत्न शहाजीराव बलवंत यांच्या सिद्धहस्त लेखणीने केला आहे.’
शहाजीराव बलवंत म्हणाले, निवृत्तीनंतर ग्रामीण, दलित स्त्रीच्या व्यथा, अडचणी, शिक्षण व अधिकारी म्हणून काम करीत असताना आलेले अनुभव व त्याचे समाजात दिसणारे प्रतिबिंब दाखविण्याचा प्रयत्न मी या कादंबरीद्वारे केला आहे.
डॉ. पांडुरंग भोसले म्हणाले, माणदेशी मातीत उगवलेली, सतत धडपडणारी, दलित मानसिकतेतून आणि जातीय गुलामगिरीतून बाहेर पडून इतरांना प्रेरणा देणारी व समाजाला भूषण ठरणारी मुख्य व्यक्तिरेखा वंदना शहाजीराव बलवंत यांनी या कादंबरीत रेखाटली आहे.
गायकवाड म्हणाले, राजकारणामुळे होणार्या घटना व त्यामुळे निर्माण होणारी गोरगरिबांची व्यथा, राजकारण त्यामुळे समाजाची झालेली अवस्था यावर आता लिखाण होण्याची गरज आहे.