पुणे | शहरात (Pune Crime) गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुडगूस घातला आहे. या कोयता गँगच्या (Koyta Gang) मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात झाडाझडती करत अनेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, तरीही कोयता गँगच्या दहशतीतून पुणेकरांची सुटका झालेली नाही. पुणेकरांच्या मनात कोयता गँगची दहशत निर्माण झालेली असतानाच मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये महिलांच्या हातात कोयते दिसत आहेत. वसंत मोरे (Vasant More) यांचं हे ट्विट सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलं आहे.
वसंत मोरेंचं ट्विट काय आहे?
ट्विटमध्ये वसंत मोरेंनी म्हटलं आहे की, ‘आज सकाळी जिम ला चाललो होतो. अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या. मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का की मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या.’
‘पण असं वाटण्यामागे कारण असं की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमध्ये सकाळी 6 वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला. जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये, असंही मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.’