मुंबई : (Vedanta Foxconn project to Gujarat) वेदांता समूहाने तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा झाली. अन् राज्यात यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात यावा यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. राज्यात ही मोठी गुंतवणूक यावी यासाठी राज्य सरकारने वेदातां-फॉक्सकॉन समूहाला मोठी सवलत दिल्या असताना हा प्रकल्प गुजरातला कसा गेला असे प्रश्न आता विरोधकांकडून विचारण्यात येत आहेत.
दरम्यान, सेमी कंडक्टरच्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारकडून 39 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात आली होती. तळेगावमधली 400 एकर जागा मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित 700 एकर जागा ही 75 टक्के दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी 1200 मेगावॅटचा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षांसाठी तीन रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता. या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वीस वर्ष दररोज 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार होता. पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. वीजेच्या दरात दहा वर्षांसाठी साडेसात टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वेदांता-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागा विचारपूर्वक देण्यात आली होती. या भागाचे वातावरण, कुशल मनुष्यबळ, पुरवठा साखळी अशा अनेक जमेच्या बाबी आहेत. त्याशिवाय, मुंबई-पुणे ही शहरेदेखील या प्रकल्पाच्या जवळ आहेत. त्याचा फायदा वेदांता-फॉक्सकॉनला झाला असता. येवढ्या मोठ्या सवलती दिल्या असताना हा प्रकल्प अचानक गुजरातला कसा जातो असा प्रश्न विरोधी नेते विचारत आहेत.