संगमनेर | कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा काल वाढदिवस झाला. त्याच दिवशी बाळासाहेब यांनी सर्वांना धक्कादायक बातमी दिली. त्यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे काल समजले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. अशातच इंदूरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रभर कॉंग्रेसच्या वर्तुळात त्या व्हिडिओचीच चर्चा आहे.
7 फेब्रुवारी रोजी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याच निमित्ताने सायंकाळी इंदुरीकर महाराजांचे किर्तनही आयोजित करण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल जे भाष्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, पटोले-थोरात वाद सुरू असतांना इंदूरीकर महाराज यांचे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
किर्तन सोहळ्यात इंदूरीकर महाराज म्हणाले, कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे. जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो असंही इंदूरीकर महाराज म्हणाले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद हायकमांड पर्यन्त जाऊन पोहचला आहे. त्याच काळात इंदूरीकर महाराज यांचा हा व्हिडिओ थोरात समर्थक सोशल मीडियावर शेअर करत आहे.