“माझा जीव गेला तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला…”, विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Maratha Protest – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. जर मराठा आरक्षणाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, जर सरकार कुणबी प्रमाणपत्र देत असेल तर मराठी समाजाला आरक्षण हे ओबीसीमधून देणार का? जर ओबीसीमधून मराठा आरक्षणाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. तसंच टक्का वाढवून देत नसाल तर मग आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही. माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भलेही माझा जीव गेला तरी चालेल, पण जनतेमध्ये गैरसमज पसरवू नका. एकीकडं बावनकुळे वेगळी भूमिका घेतात तर दुसरीकडे सरकार वेगळी. जनतेला फसवण्याचं काम सुरू आहे.

जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून खूशाल घ्यावं. कारण ओबीसींमध्ये 52 टक्के लोक येतात आणि 27 टक्के ओबीसी आरक्षण आहे. सरकार जर आरक्षण वाढवून देत असेल तर माझी काही अडचण नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

admin: