नागपूर : (Vijay Wadettiwar On Supreme Court Result) नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित असलेल्या सर्व विकासकामांना स्थगिती दिली आहे. वैयक्तिक कामे रद्द केली किंवा स्थगिती दिली तर ठिक आहे. पण सरसकट विकासकामांना स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या विकास साधणारी जलसंधारणाची कामे सर्वच आमदारांच्या मतदारसंघात होणारी कामे रद्द करण्यात आली आहेत. अशाप्रकारे कामे रद्द केल्यानं सरकारनं जनतेवरच अन्याय केला असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांकडून पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणावर सोमवारी (दि. ११)रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संविधानावर आधारित व कायद्यानुसार निर्णय झाल्यास राज्यात नव्याने राजकीय भूकंप येईल, असे भाकित विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले
उद्याच्या निकालाकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. निर्णय संविधानानुसारच होतात. उद्याच्या निकालावर बरेचसं काही अवलंबून आहे. निकाल विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला तर पुन्हा राजकीय भूकंप येईल. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे. उद्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यावर अधिक काही भाष्य करता येत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.