मुंबई | Vijay Wadettiwar – अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमध्ये देखील बैठक घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवारांचा हा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मोठा निर्णय घेतला. यापुढे अजित पवारांनी कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) जाईल. त्यानंतर ती फाईल अंतिम सहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाईल. पण त्याआधी त्या फाईलवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी लागेल, असा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम. अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिने देखील झाले नाही पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले.
कोणत्याही फाईली, विशेषत: वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांना नक्कीच कळलं असेल एखाद्याला जेवायला आपले ताट द्यावे पण बसायला पाट देऊ नये, असा खोचक टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.