जळगाव : (Vinod Patil On Girish Mahajan) जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला फोनवरून झापतानाची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होणाऱ्या कथित ऑडियो क्लिपमुळे महाजन यांच्यावर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे.
दरम्यान मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुद्धा महाजन यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?, असा टोला विनोद पाटील यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद भरतीसंबंधी केलेल्या अर्वाच्य वक्तव्याचा जाहीर निषेध पाटील यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये 13 हजार 521 जागांसाठी जवळपास 13लाख परीक्षार्थींनी अर्ज केले. या परीक्षार्थीकडून 25 कोटी 87 हजार रुपये आपल्या सरकारने जमा केले. मग परीक्षा कधी असे विचारल्याचा इतका राग का?, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.