मुंबई | Vivek Agnihotri On Koffee With Karan 7 – करण जोहरचा ‘काॅफी विथ करण’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. सध्या या कार्यक्रमाचे सातवे पर्व सुरू आहे. तसंच ‘काॅफी विथ करण’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. गुरुवारी या कार्यक्रमाचा नवीन भाग प्रदर्शित झाला. या भागामध्ये सोशल मीडियावरील सेलिब्रिटींना बोलवण्यात आलं होतं. याच दरम्यान, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाबद्दलचे त्यांचे मत मांडत करणवर खोचक टीका केली आहे.
ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी धार्मिक विचार मानणारा व्यक्ती आहे. माझं आयुष्य सेक्स आणि गॉसिप्सभोवती फिरत नाही. त्या कार्यक्रमामध्ये योगदान देण्यासाठी माझ्याजवळ काहीही नसल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला कधीही जाणार नाही. मी मध्यमवयीन माणूस आहे. मला दोन मुलं आहेत. सेक्स हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वपूर्ण विषय नाहीये.”
“मला तेथे बोलायला विषयच नसतील. आता आपले संभाषण सुरु आहे. मी तुमच्यासह सेक्सवर किंवा त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर बोलू शकतो. त्या कार्यक्रमातील कृत्रिमतेमुळे तेथे जाऊन गप्पा मारणे मला जमणार नाही. मी धार्मिक वृत्तीचा आहे. मी आणि माझी पत्नी खूश आहोत. पण माझ्या आयुष्यात सेक्स हा मुद्दया केंद्रस्थानी नाहीये. माझ्या मते. हा फालतू कार्यक्रम आहे. ते काय करत आहेत, काय बोलत आहेत याचा संदर्भच लागत नाही. कोणालाही त्याचं बोलणं रिलेट होत नाही. ते त्यांच्या छोट्या वर्तुळामध्ये राहून त्यांच्याच मित्रांना खूश करायचा प्रयत्न करत असतात आणि एखादी वाहिनी याचे त्यांना पैसे देते”, असंही विवेक अग्निहोत्री म्हणाले.