समलैंगिक विवाहावर विवेक अग्निहोत्रींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, संबंध गुन्हा नाही तर ती गरज…

मुंबई | ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने ज्याचं नाव संपूर्ण जगाला कळलं ते नाव म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी या त्यांच्या पत्नी आहेत. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सामाजिक राजकीय मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी समलैंगिक विवाहाला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे. अशा प्रकारची लग्न करणं गुन्हे नाहीत तर ती गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

सुप्रिम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं केलेल्या अर्जासंदर्भात विवेक यांनी एक ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी समलैंगिक विवाह हे शहरी आयुष्यातील सर्वसामान्य अशी गोष्ट आहे, असं म्हटलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,’ नाही. समलैंगिक लग्न ही उच्चभ्रू समाजातील संकल्पना नाही. तर ती एक मानवी गरज आहे. हा अर्ज अशा सरकारी अधिकाऱ्यानं तयार केला असावा, ज्यानं कधीही लहान गावांत अथवा खेड्यांमध्ये प्रवास केलेला नाही. किंवा त्यानं मुंबईतील लोकलमध्येही प्रवास केलेला नाही. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की समलैंगिक संबंध ही संकल्पना नाही तर ती एक गरज आहे.एक अधिकार आहे. भारतासारख्या प्रगतिशील, उदार आणि सर्वसमावेशी संस्कृतमध्ये समलैंगिक विवाह हा गुन्हा नाही तर त्याचा स्वीकार व्हायला हवा.’

दरम्यान, समलिंगी विवाह कायद्यासाठी आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश एस. के. कौल, रविंद्र भट, हिमा कोहली, पी. एस. नरसिंह यांच्या घटनापीठासमोर आज मंगळवारी (१८ एप्रिल) सुनावणी होणार आहे.

Dnyaneshwar: