“तुम्हाला पटलं तर मत द्या, नाहीतर देऊ नका; मी आता…”, नितीन गडकरींचं वक्तव्य

नागपूर | Nitin Gadkari – “तुम्हाला पटलं तर तुम्ही मला मतं द्या, नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावणार नाही”, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये (Nagpur) वनराई फाऊंडेशनच्या वतीनं सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरींना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, “वातावरणातील बदल, जलसंवर्धन आणि पडीक जमिनीचा योग्य वापर अशा क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव असून त्या क्षेत्रात जिद्दीनं काम करत आहे. मी प्रेमानं नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यात या क्षेत्रात जोमानं काम करायचंय, कारण यामुळे फक्त भारताची अर्थव्यवस्था नाही तर ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकतो,” असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

“आजपर्यंत मी भरपूर कामं केली आहेत. जर ती लोकांना पटली असतील तर लोक मला मतं देतील, नाहीतर देणार नाहीत. मी आता काही लोणी लावायला तयार नाही. मी नाही तर मग माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल. खरं म्हणजे या कामाला मला जास्त वेळ द्यायचा आहे. तसंच या कामातून भविष्य बदलू शकतं हे मला दिसतंय,” असंही गडकरी म्हणाले.

Sumitra nalawade: