इस्रायलविरुद्ध युद्ध सुरुच राहील : ‘हिजबुल्ला’च्‍या नव्‍या म्‍होरक्‍याचा इशारा

दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा नवा म्‍होरक्‍या नईम कासिम

इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर लेबनॉनमधील इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाने (Hezbollah) नईम कासिम (Naim Qassem) याची नवीन म्‍होरक्‍या म्हणून निवड केली आहे. संघटनेची सूत्रे हाती घेताच त्‍याने इस्रायलविरुद्ध युद्ध सुरुच ठेवणार असल्‍याचा इशारा दिला आहे.

हिजबुल्‍लाची सूत्रे हाती घेताच आपल्‍या पहिल्‍या सार्वजनिक संदेशात नईम कासिम याने म्‍हटले आहे की, “आम्ही इस्रायलविरुद्धचे युद्ध सुरु ठेवणार आहोत. हसन नसराल्लाह यांच्‍या मार्गवरुनच आम्‍ही जाणार आहोत. इस्त्रायल आमच्यावर हल्ला करेल याची वाट पाहत थांबण्यापेक्षा हल्ल्याचा प्रतिकार करणे आमच्यासाठी चांगले आहे. आम्ही तयार आहोत. इस्रायल आमच्यावर युद्ध लादले आहे.”

हिजबुल्लाच्या नव्‍या म्‍होरक्‍याला इस्रायलची उघड धमकी

मंगळवारी हिजबुल्‍लाने कासिमची नियुक्‍ती हसन नसरल्‍लाहचा उत्‍तराधिकारीच्या स्‍वरूपात केली. त्‍याच्‍या निवडीनंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी नईम कासिमला इशारा दिला आहे की, ‘ त्‍याची नियुक्‍ती तात्पुरती आहे. जास्त काळ नाही’

इस्रायलने हिजबुल्लाचे कंबरडे मोडले

इस्रायलने मोठ्या प्रमाणात हवाई हल्‍ले करत हिजबुल्‍लाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये अनेक वरिष्‍ठ कमांडरना ठार करण्यात आल्‍याने हिजबुल्‍लाहचे वरीष्‍ठ नेतृत्‍व जवळपास संपुष्‍टात आले आहे. मारल्‍या गेलेल्‍या म्‍होरक्‍यांमध्‍ये हसन नसरल्‍लाह, संस्‍थापक सदस्‍य फौद शुकर, वरिष्‍ठ कमांडर अली कराकी, केंद्रीय परिषदेचे उप प्रमुख नबील कौक, ड्रोन युनिट प्रमुख मोहम्‍मद सरूर, मिसाईल युनिट चीफ इब्राहिम कुबैसी, ऑपरेशन कमांडर इब्राहिम अकील आणि वरिष्‍ठ कमांडर मोहम्‍मद नासिर यांचा समावेश आहे.

कोण आहे नईम कासिम?

नईम कासिम हा हिजबुल्‍लाच्या स्‍थापना सदस्‍यांपैकी एक आहे. १९७० मध्ये त्‍याने लेबनॉनच्या विद्यापीठात रसायन शास्‍त्राची पदवी घेतली. अयातुल्ला मोहम्मद हुसेन फदलल्लाह यांच्या हाताखाली धार्मिक अभ्यासही केला. 1974 ते 1988 या काळात नईम कासिमने इस्लामिक धार्मिक शिक्षण संघटनेचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

Rashtra Sanchar: