पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवा : केंद्रीय मंत्र्यांना साकडे

पिंपरी-चिंचवड शहराच्या चारही बाजूंनी उद्योग, कारखाने आहेत. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तसेच कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी, पवना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Project) (एसटीपी) उभारण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवडला (Pimpari Chinchwad)‘वॉटर प्लस सिटी’ (Water Plus City) बनवण्यासाठी निधी देण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केंद्र सरकारकडे केली.

खासदार बारणे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेत निधी देण्याची मागणी केली. शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेने ३३३ एमएलडी क्षमतेचे १३ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने इकोसिस्टम स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमामुळे शहराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांवरील मागणी आणि ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. जलप्रदूषण कमी करून जलस्रोतांचे संरक्षण होईल. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा खर्चाच्या तुलनेत स्वस्त आहे. महापालिका (PMC) कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या सहकार्याने ४५ एमएलडी (MLD) क्षमतेचे एसटीपी उभारत आहे. सांडपाण्यावर तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे पुनर्वापर केलेले पाणी विविध उद्योगांना त्यांच्या वापरासाठी पुरवठा करता येईल. महापालिकेने १५ जानेवारी २०१४ रोजी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जलशक्ती मंत्रालय यांच्याकडे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प राबविण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत सांडपाणी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी निधी देऊन सहकार्य करण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

Rashtra Sanchar Digital: