दोन-अडीच वर्षांपासून सांगत होतो, आमचं सरकार येणार!

पुण्यात भाजपतर्फे पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार

पुणे : महाविकास आघाडीची सत्ता असताना ठाकरे सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. सरकार कोसळण्याच्या दर वेळेस नव्या तारखा जाहीर करणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आता एक नवा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरू होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘दोन-अडीच वर्षे मी म्हणत होतो, की आपले सरकार येणार. मी काही वेडा नव्हतो. मला माहिती होते की आपले सरकार येणार. अडीच वर्षे खरेच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो. अडीच वर्षे लागली, पण सरकार आणले’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
बरेचदा संबंधित तारखांना ठाकरे सरकार न पडल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून त्यांची कायम खिल्ली उडवली जायची. नंतरच्या काळात चंद्रकांत पाटील यांचा सरकार पडण्याचा दावा कोणीही गंभीरपणे घेईनासे झाले होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या बंडामुळे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे ५० आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले.

त्यामुळे पाटील यांची भविष्यवाणी उशिरा पण खरी ठरल्याचे जाणवले. मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आम्ही जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले, असा आरोपही त्यांनी केला.

या प्रसंगी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर, हेमंत रासने, राजेश पांडे, दीपक नागपुरे, ॲड. एस. के. जैन, बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

Prakash Harale: