मुंबई : मशिदींवरील भोंगे कोणी जबरदस्तीने उतरवण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. हे संविधानाचे राज्य असून इथे कुणाची मनमानी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे रोजी ईद असल्यामुळे भोंग्यांना हात लावणार नाही, परंतु ४ मे रोजी ते काढणार, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधानविरोधी आहे. रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनीसुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आठवले यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील व्यक्तींनीही संयम पाळावा. आक्रमक उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये, असे आवाहन देखील आठवले यांनी केलं आहे. समाजात शांतता-बंधुता-सौहार्द टिकवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला आहे असंही ते म्हणाले.