मुंबई : सोमवारी रात्री विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत फूट पडल्याच्या बातम्या येत असून कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासह शिवसेनेचे २१ आमदार यांचा संपर्क होऊ शकत नाही. यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची तातडीने बैठक बोलावली आहे. यावरच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंना शाबासक्की दिली आहे.
नारायण राणे म्हणाले की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता… त्यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असून दिघे यांचे नाव घेत नारायण राणे यांनी या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांना भावनिक केलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर आता महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केलं आहे की, एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा संपर्क झाला असून काही गैरसमजातून एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन गेले असल्याचं राऊतांनी सांगितल. आता एकनाथ शिंदे नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.