नवी दिल्ली : (WFI president Brij Bhushan Sharan Singh likely to resign) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (BrijBhushan Sinh) यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.
अयोध्या इथं कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आहेत. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक ऑलिम्पिकपटू सध्या दिल्लीतील जतंरमंतर मैदानात १८ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये विनेश फोगाटनं बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचं आणि महिला प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
जोपर्यंत बृजभूषण सिंह यांच्यासह फेडरेशनमधील इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकही कुस्तीपटू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण फेडरेशनचा अध्यक्ष या नात्यानं या प्रकरणाची चौकशी करु शकत नाही, असंही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.