पुण्यातील सुंदरीची चर्चा ; बारा लाख रुपये खर्च
पुणे : सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यांचा तो डायलॉग काय ते हाटील, काय डोंगार, काय ती झाडी, समदं ओके आहे बघा… या डायलॉगने राज्यभर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. पुण्यातही त्याचप्रमाणे एका रिक्षाचालकाने बनवलेल्या रिक्षाकडे पाहिल्यावर असेच म्हणावेसे वाटते आहे. काय ती रिक्षा… काय ती सीट, काय तो कुलर, काय ती स्क्रीन, काय तो फ्रीज. समदं ओके हाय बघा… पुण्यातल्या सहकारनगर येथे राहणार्या इरफान शेख यांनी पुण्याची ‘सुंदरी रिक्षा’ बनवली आहे. ही रिक्षा बनवताना त्यांनी बायकोवर जेवढा खर्च केला नाही तेवढा खर्च या रिक्षावर केला आहे. तब्बल १२ लाखांहून अधिक खर्च या रिक्षामध्ये इरफान याने केला आहे.
ज्या सुविधा मोठमोठ्या वाहनांमध्ये असतात, त्याच सुविधा या रिक्षामध्ये आहेत. आकर्षक अशी रिक्षाच्या बाहेर सजावट करण्यात आली आहे. आतमध्ये एलईडी स्क्रीन, छोटा फ्रीज, कुलर, आकर्षक अशी लायटिंग, दोन झुंबर, मेडिकल बॉक्स आणि बीएमडब्ल्यूची बैठक व्यवस्था अशा पद्धतीने इरफान यांनी यात व्यवस्था केली आहे. पुणे शहरात अशाप्रकारची आगळीवेगळी जुगाड रिक्षा बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. शेख हे मूळचे पुण्याचेच. एक छंद म्हणून ते रिक्षा चालवण्याचे काम करतात. मला आवड असल्याने मी ही रिक्षा बनवली आहे.
अनेक स्पर्धेत या पुण्याच्या सुंदरीने नंबर पटकावला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि सातारा भागातून सेवा देण्याचे काम शेख करीत आहेत. याशिवाय मोठ्या घरामध्ये जसे आपण वर झुंबर लावतो तसे झुंबर या रिक्षातदेखील लावण्यात आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी ही रिक्षा अतिशय आकर्षक लायटिंगमुळे सुंदर दिसते. प्रवाशांनाही वाटेल की, आपण कशातून प्रवास करतो ते. त्यांनी बनवलेल्या रिक्षात वाढीव कुठलाही भाव नाही. जो आपण इतर रिक्षांना देतो, तोच भाव या रिक्षालाही आहे.