काय तो राडा, काय नेते!

गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा कमी मिळाल्या होत्या. त्या दोन जागा ते सहज फोडू शकले, मात्र बंद खोलीत, खासगी निरोपात जे काही शिजले त्यानुसार मुंबईचे महापौर शिवसेनेचे झाले. त्यावेळी जे नगरसेवक फोडले होते ते साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी फोडले होते. आता ती वेळ येणार नाही.

प्रभादेवी येथे ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला. त्याचबरोबर मुंबईत भाजप आणि ठाकरे गटात वादावादी आणि भांडणे झाली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. मतभेदाचे रुपांतर द्वेषात होत आहे. सत्ता मिळवणे आणि आपले अस्तित्व टिकवणे हा महत्त्वाचा विषय सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने आहे.शिवसेनेच्या दृष्टीने तर अत्यंत कळीचा मुद्दा आहे. राज्य गेले. सत्ता गेली.आमदार गेले. मुंबईत पत वाचवण्यासाठी आता धडपड केली पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे या महत्त्वाच्या आणि मुंबईतील इतर महापालिकांत आपल्या नावाचा शिक्का जमवणे आवश्यक आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ती ताब्यात राहावी, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. शिवसेनेने ही महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी आजवर मराठीनंतर हिंदुत्व हे पत्ते वापरले.

आज मराठी हा मुद्दा संपल्यात जमा आहे, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यापासून हिंदुत्व हा मुद्दा मनसे किंवा भारतीय जनता पक्षाने आपल्या ताब्यात असल्याचे प्रकर्षाने दाखवायला सुरुवात केली. एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा सोडला तर इतर धर्मियांची मते आपल्याला मिळतील, ही ठाकरे थिंक टँकची अटकळ असली तरी इतर धर्मीयांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा प्रामुख्याने वाटा आहे. हा वाटा महापालिका ते लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना जपून ठेवायचा आहे.खरे तर शिवसेना हा सगळ्या जातीधर्माचा पक्ष आहे. सर्वसाधारणपणे राजकारणात समाजातील ज्या मंडळींना येणे अशक्य अवघड वाटत होते त्यांना (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या उच्च पदावर बसवले. साहजिकच आजही (स्व.) बाळासोहब ठाकरे यांच्याबद्दल सच्चा शिवसैनिक कृतज्ञ आहे आणि हीच कृतज्ञता मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या जागा शिवसेनेला मिळवून देत होत्या. मात्र आता (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांची ताकद नव्या नेतृत्वात राहिली नाही, हे ४० आमदारांच्या फुटीवरून दिसून आले आहे. साहजिकच महापालिका मिळवण्यासाठी पराकोटीचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा कमी मिळाल्या होत्या. त्या दोन जागा ते सहज फोडू शकले, मात्र बंद खोलीत, खासगी निरोपात जे काही शिजले त्यानुसार मुंबईचे महापौर शिवसेनेचे झाले.

त्यावेळी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जे नगरसेवक फोडले होते, ते त्यावेळचे शिवसैनिक आणि साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी फोडले होते. आता विजयबापू शिवतारे यांच्यावर नगरसेवक फोडण्याची वेळ येणार नाही, यात शंका नाही. मुद्दा असा आहे, राजकीय पक्षांचे नेते कधीही सत्ता समजुतीने एकत्र येऊ शकतात. मतभेद बाजूला ठेवून सत्ता मिळवू शकतात. विषय असतो सर्वसामान्यांचा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा. हाणामाऱ्या केल्या जातात. खटले, गुन्हे दाखल केले जातात.कार्यकर्ते हेलपाटे घालतात. तरुणांचे भवितव्य बरबाद होते. तर सर्वसामान्यांना अगदी सामान्य, साध्या साध्या गरजांसाठी नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात.रस्त्यावरचे तेच खड्डे, सांडपाणी, दुर्गंधी, कचरा, पिण्याचे पाणी, वीज, दाखले, शिक्षण या चक्रात अडकलेले असतात. त्यांचे हाल कोणी विचारत नाही. महापालिकेचे प्रश्न अजून जटिल आहेत. त्यात राजकीय महत्त्वाकांक्षा, हेवेदावे आणि सत्तेचा सारीपाट खेळण्यासाठी आपल्याशिवाय सगळ्यांना वापरण्याचा विचार आता राजकारण्यांनी कमी केला पाहिजे. मंगलमूर्तीच्या विसर्जनादिवशी भांडणे आणि राडा संस्कृतीला किमान एक दिवस तरी थांबवले पाहिजे, मात्र राजकारण म्हणजे द्वेष, राग याचा अवलंब हे समीकरण होत असल्याने बुद्धीच्या देवतेने आपल्या कपाळाला हात लावण्याशिवाय काय करावे? शेवटी एकच म्हणावेसे वाटते काय तो राडा… काय ते नेते सगळं ओक्केच आहे?

Nilam: