मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला वेगळं वळण आलं होत. यानंतर शिवसेनेचे कट्टर आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केला. सत्तापरिवर्तन होणार का असे प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे आणि अपक्ष असे मिळून ५० पेक्षा जास्त आमदार शिंदे गटात सहभागी झाले होते. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत सूरत, गुवाहाटी, गोवा असा दौरा करुन अखेर एकनाथ शिंदे आज मुंबईत परतले आहेत. तर काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी बहुमताची ताकद दाखवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ही घोषणा केली आहे.
काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज लगेचच देवेंद्र फडणवीस आणि भाजपने बहुमत सिद्ध करण्याची धावपळ सुरू केली. सकाळी एकनाथ शिंदेही मुंबईत आले आहेत. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमताचा दावा केला. राज्यपालांनीही ती मान्य केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं आहे. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेल्या संख्याबळाचं गणित मांडलं आहे. शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपा विधिमंडळ गट, अपक्ष १६ आमदार आपल्यासोबत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत म्हटलं आहे की, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. गेले अडीच वर्ष महाविकस आघाडीने सत्तेत असतानादेखील काहीच प्रगती केली नाही. तसंच एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघडीतून बाहेर पडा आम्ही माघारी येतो असं म्हंटलं होत तरीही उद्धवजींनी ऐकलं नाही यामुळे शिवसेनेतील अनेक आमदार महाविकास आघाडीवर नाराज असल्याने त्यांनी बंड करत हा मार्ग निवडला आहे असं फडणवीस म्हणाले.