मुंबई | Jaipur Express Firing – जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलने (RPF Constable) गोळीबार केला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा गोळीबार जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास झाला. या गोळीबारानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेतलं आहे.
हा गोळीबार आरपीएफ हवालदार चेतन सिंह याने केला आहे. तसंच प्राथमिक माहितीनुसार, आरोपी चेतन सिंहने मानसिक छळ आणि काही कारणावरून अस्वस्थ असल्याची तक्रार केली आहे. मात्र, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
आरोपी चेतन सिंह याची नुकतीच मुंबईमध्ये नियुक्ती झाली होती. तसंच आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस्कॉर्टिंगसाठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये नेहमी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पोलीस तैनात असतात. एस्कॉर्टिंग म्हणजे पोलीस एक्सप्रेस ट्रेनवर नजर ठेवतात आणि ते ट्रेनने प्रवास करतात. तर आरोपी चेतननं काल सूरत रेल्वे स्थानकापर्यंत एक ट्रेन एस्कॉर्ट केली होती. त्यानंतर सूरत रेल्वे स्थानकावर आल्यावर त्यानं काहीवेळ विश्रांती घेतली. तर चेतन आज पहाटे 2.50च्या दरम्यान सूरत रेल्वे स्थानकावरून जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चढला. त्यावेळी चेतनसोबत दोन हवालदार आणि एएसआय टिकाराम हे सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी होते.
तर मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन पालघर रेल्वे स्थानकावरून जात असताना चेतननं गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबारानंतर आरोपीनं विरार चेन पुलिंग केले आणि आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण आधीच सतर्क झालेल्या पोलिसांनी आरोपीला रेल्वे स्टेशनवर पकडले. या घटनेनंतर बोरीवली रेल्वे स्थानकावर ट्रेनमधील मृतदेह काढण्यात आले आणि ते जवळच्या सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.