पुणे : आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना “सत्ता गेल्यानतंर काही लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यानंतर काही वेळातच भाजपा कार्यालयातील पत्रकारपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांना यावरून प्रत्युत्तर दिलं आहे.
“जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी सरकार पाडलं मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं? मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितला आहे. अशाप्रकारे सरकारं पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं. अस्वस्थतेशिवाय थोडी होतं. कोणी स्वस्थ बसला आणि मॅच पाहतोय, तो थोडीच असं करतो. त्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे. मला चिंता नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.