रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार ?

पिंपरी : प्रवाशांनी रेल्‍वे विभागाकडे अनेकदा मागणी केली आहे की, मुंबईला जाणाऱ्या रेल्‍वेमध्ये पिंपरी आणि चिंचवडसाठी स्‍वतंत्र बोगी ठेवण्यात यावी. परंतु याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आता परिस्‍थिती हाणामारीपर्यंत जाऊन पोहचली आहे.

बुधवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांची जागेच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणांमुळे अतिरिक्‍त बोगीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पिंपरी-चिंचवडमधून रोज शेकडो प्रवासी मुंबईला अप-डाऊन करतात. त्‍यांच्‍यासाठी रेल्‍वे हेच सर्वांत महत्त्वाचे साधन आहे. यामुळे प्रवाशांनी रेल्‍वे प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली आहे की, सिंहगड एक्‍सप्रेसमध्ये पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगवेगळी बोगी देण्यात यावी. पुण्याहून मुंबईला सकाळी जाणाऱ्या रेल्‍वेंपैकी केवळ सिंहगड एक्‍सप्रेसलाच पिंपरी आणि चिंचवड रेल्वे स्टेशनवर थांबा दिला आहे. त्यातच पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी केवळ एकच रेल्वेबोगी देण्यात आली आहे. पिंपरीमध्ये रेल्वेचे टीसी केवळ बोगीचा एकच दरवाजा उघडतात आणि अर्ध्या बोगीत हात धरून उभे राहतात. जेणे करून उर्वरित अर्धी बोगी चिंचवडमधील प्रवाशांना मिळावी.
दररोजचे प्रवास करणारे आणि इतरवेळी कामानिमित्त आणि कुटूंबासह जाणाऱ्या प्रवाशांसाठी या जागा असतात. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्‍याने एक बोगी अपुरी पडत आहे. त्‍यामुळे जागेवरुन वादाचे प्रसंग रोज उद्भवत आहेत. बुधवारी ही वादा-वादी हातघाईवर आली.

पिंपरी, चिंचवडमध्ये बहुतेक रेल्‍वेंना थांबा नसल्‍याने प्रवासी पुणे स्टेशन ते मुंबई असा पास काढतात. पिंपरी आणि चिंचवड रेल्वे स्टेशनवरून पास काढणाऱ्यांची संख्या कमी दिसून येते. यामुळे कमी असल्‍याचे कारण देत रेल्‍वे प्रशासन सातत्‍याने दुर्लक्ष करत आहे.

Sumitra nalawade: