मुंबई | Nawab Malik – माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कस्टडीमध्ये होते. तर आता नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक यांची सोमवारी (14 ऑगस्ट) तुरूंगातून सुटका झाली. मात्र, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबतच्या चर्चा सगळीकडे सुरू होत्या. तर याबाबत आता मलिकांनी स्वत:च स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार याबाबत त्यांनी स्पष्टच सांगितलं. कोणत्याही गटात मी जाणार नाही. मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबतच मी राहणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलं आहे.
पुढे नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या आरोग्याची काळजी घेणं हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. मी शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरकडून उपचार घेणार आहे. त्यामुळे माझी प्रकृती लवकरच बरी हाईल अशी मला आशा आहे.