वाहतूक शाखेचे पोलिस ‘असून अडचण नसून खोळंबा’..!
उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील महामार्गावरील वाहतुकीची कोंडी ही दररोजची डोकेदुखी होवून बसली आहे. मात्र, लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गतची वाहतूक पोलीस शाखा नेमके काय करत आहे? असा प्रश्न विचारून जनता त्रस्त झाली आहे.
गर्दीच्या चौकात गेल्या एक दीड महिन्यांपूर्वी स्वयंचलित वाहतूक सिग्नल बसवल्यात पण त्या सुरु करण्यासाठी प्रशासन का थांबलय ते कळत नाही. या सिग्नल चालूच करायच्या नव्हत्या तर त्या बसवल्याच कशाला ? असा प्रश्न वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले नागरिक विचारत आहेत. कदमवाकवस्ती (स्टेशन), लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेले सेवा रस्ते आहेत का नाही, असाही प्रश्न जर कोणी विचारला तर काही चुकीचे होणार नाही. कारण हे सेवा रस्ते कायम कोणत्या ना कोणत्या अतिक्रमणाने ग्रासलेले आहेत ! बर ही अतिक्रमणे ग्रामपंचायत, पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरद हस्ताशिवाय होवूच शकत नाही, ही पण काळ्या दगडावरची रेघ आहे.
रस्त्यावरील खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी, वाहतूक नियमांना ठेंगा दाखवून धावणारी अवैध प्रवासी वाहने मात्र वरील तीनही चौकात उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यात थांबलेली अवैध प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा, सिक्स सीटर, जीप व अन्य वाहने हटवून वाहतूकसाठी रस्ता कसा मोकळा राहील व वाहतूक कशी सुरळीत होईल, हे कर्तव्य वाहतूक पोलिसांचे आहे. मात्र, हे पोलीस याकडे दुर्लक्ष करीत गिऱ्हाईक शोधण्यात मश्गुल राहतात आणि वाहतूक कोंडीचा तिढा
सुटत नाही! सर्वसामान्य नागरिकांचे वाहन रस्त्यात थांबताच त्याला आरेरावी करणारे पोलीस लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकात थांबलेल्या वाहनांवर कारवाई का करीत नाहीत ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या ठिकाणी असलेले चौक चक्क वाहनतळ झाले आहेत.
या चौकातून शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या चौकात भाजी बाजारासह बाजारपेठही नांदत आहे. मात्र हा चौकच वाहतूक नियमनात नापास झाल्याने मुख्य रस्त्यावर असलेली वाहनांची पार्किंग, बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशा कारणांनी वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. सर्वसामान्य नागरिकांना लहान – लहान बाबींमध्ये नियमांचा बडगा दाखवून दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल एक शब्द ही बोलत नाहीत, कारवाई तर खूप लांबची गोष्ट बनली आहे.