मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. त्याचे कारण म्हणजे शिंदे गटाने १९ जुलै रोजी निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी आमच्या गटाला दोन तृतीयांश आमदार तसेच खासदारांचा पाठिंबा आहे, असे नमूद करण्यात आले होते. तसेच आमच्याजवळ एक राष्ट्रीय कार्यकारिणी देखील आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाने या पत्रात केला आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ शकतो याची कल्पना येताच शिवसेनेने 11 जुलै रोजी निवडणूक आयोगाकडे एक कॅव्हेट दाखल केले होते. या कॅव्हेटमध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी शिवसेनेचे मत जाणून घ्यावे, अशी विनंती करण्यात आली होती.
या मागणीनंतर येत्या ८ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटनेवर आमचेच वर्चस्व आहे, हे सिद्ध करावे, असे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समर्थनाचे शपथपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आयोगाच्या या निर्णयाला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आहे. त्यामुळे येत्या काळात धनुष्यबाण नेमका कोणाचा हे सर्वोच्च न्यायालयातच समजणार आहे.