मुंबई | Supreme Court Live Streaming – आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. तसंच शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE होणार आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय लाईव्ह सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आज सुनावणी होणार आहे. तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेसंबधी निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद शिवसेनेने सुप्रीम कोर्टात केला होता. दरम्यान, या सगळ्या युक्तिवादानंतर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत म्हटलं होतं.