राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना कोण आवरणार?

सावरकरांच्या प्रतिमेला स्पर्श कराल, तर हात छाटू! प्रमोद मुतालिक : श्रीराम सेनाप्रमुखांची धमकी

गेल्या काही महिन्यांत भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा महापूर आल्याचे दिसून येत आहे. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण व्हावी आणि सामाजिक शांतता भंग पावावी, या हेतूने काही देशविरोधी शक्ती अशा घटनांचे भांडवल करून देशभर अशांतता माजवण्यात आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक प्राधान्याने हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या शक्तींना रोखणे तातडीने गरजेचे आहे. ‘सावरकरांच्या प्रतिमेला स्पर्श कराल तर हात छाटू’ असे कर्नाटकात कोणी म्हणतो, तर ‘भाजप आमदार पोलिसांना धमकी’ देतो. ‘मोहम्मद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार टी. राजासिंह यांना अटक’ होते, तर जेएनयूमध्ये एखादी तत्त्वज्ञ सांगते, की कोणतीही हिंदू देवता ब्राह्मण नाही. दुसरीकडे अलवार-राजस्थानमध्ये भाजप नेता म्हणतो की, त्यांनी एक; आम्ही ५ मारले. तर बिहारच्या बोधगयामध्ये ‘मंदिरात बिहारचे मुस्लिम मंत्री घुसल्याने’ वाद निर्माण होतो. अखेर हे कुठे थांबणार आहे की नाही?

शिवमोग्गा (कर्नाटक) : वीर सावरकरांच्या पोस्टरवरून कर्नाटकात वाद अजूनच चिघळत चालला आहे. यापूर्वी शिवमोग्गा येथील भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांनी मुस्लिम तरुणांना नियंत्रणात राहण्यास सांगितले होते. आता श्रीरामसेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांचे आक्षेपार्ह विधान समोर आले आहे. जर कोणी सावरकरांच्या पोस्टरला हात लावला, तर त्यांचे हात कापले जातील असे त्यांनी म्हटले आहे.

वास्तविक, कर्नाटकातील शिवमोग्गा येथे सावरकरांचे पोस्टर लावण्यावरून पूर्वी वाद झाला होता. एका गटाने सावरकरांच्या जागी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले.

दुसरीकडे या वादाच्या भोवऱ्यात श्रीराम सेनेने वीर सावरकरांचे पोस्टर राज्यभर लावण्याचे जाहीर केले आहे. प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘‘वीर सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांची १५ हजार पोस्टर राज्यभर लावण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकर मुस्लिमांविरुद्ध लढले नाहीत. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि ब्रिटिशांविरुद्ध लढले, असे सांगून मुतालिक म्हणाले की, मुस्लिम किंवा काँग्रेसमधील कोणीही त्यांच्या पोस्टरला हात लावल्यास त्यांचे हात कापले जातील. हा माझा इशारा आहे.

यापूर्वी शिवमोग्गा येथील भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांचे वक्तव्य पोस्टरच्या वादानंतर समोर आले होते. ईश्वरप्पा म्हणाले होते, की मी मुस्लिम समाजातील ज्येष्ठांना आवाहन करतो, की देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या समाजातील तरुणांवर नियंत्रण ठेवावे. हिंदू समाज उठला, तर अशा कारवाया होणार नाहीत आणि देशद्रोही टिकणार नाहीत.

शिवमोग्गा पोलिसांनी सांगितले, की टिपू सुलतानच्या अनुयायांच्या एका गटाने १५ ऑगस्ट रोजी शहरातील अमीर अहमद सर्कलमध्ये टिपू सुलतानचे बॅनर लावण्यासाठी वीर सावरकरांचे बॅनर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. कलम १४४ तत्काळ लागू करण्यात आले आहे. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. सावरकर हे हिंदुत्वाचे विचारवंत होते, तर टिपू सुलतान हे १८व्या शतकातील म्हैसूरचे शासक होते. बॅनरवरून दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीत प्रेमसिंग नावाच्या तरुणाला भोसकण्यात आले.

Dnyaneshwar: