‘जीव गेला तरी इथेच थांबेन’,…रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा का आहे विरोध?

रत्नागिरी : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.

कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला. पण जीव गेला तरी इथेच थांबेन. अशी स्थानिक महिलांची भूमिका आहे.

या प्रकल्पामुळे विकत घेतलेल्या जमिनी धोक्यात येतील तसेच मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना आहे. रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांवरही परिणाम होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प, एन्रॉन प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर राजापूर रिफायनरी प्रकल्पालाही बंद करा अशी मागणी आंदोलक करत आहेत.

कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी तसेच आणखी काही घटकांच्या विसर्गामुळे मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल. यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना स्थानिक विरोध करत आहेत.

Prakash Harale: