पंधरवडा पितृपक्षाचा
पितृपंधरवड्यात पितरांबद्दल कृतज्ञता म्हणून श्राद्धविधी केले जातात. यात पिंडास कावळाचा स्पर्श होणे हे महत्त्वाचे असते, मात्र सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वृक्षतोड त्याचबरोबर पक्ष्यांच्या अधिवासांची होणारी गैरसोय यामुळे अनेक पक्ष्यांचा संचार कमी झाला आहे. त्यात पितृपंधरवड्यात ज्याची वाट पाहिली जाते, त्या कावळ्यांची संख्या आणि अस्तित्व यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
“तस्मै स्वधा”
सध्या पितृपंधरवडा सुरू झाल्याने पितृपक्षात पितरांपर्यंत तर्पण पोहोचविण्यासाठी वाहक म्हणून कावळ्यांना घास भरविण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केला, म्हणजे पूर्वज संतुष्ट होतात, अशी श्रद्धा असल्याने पितृपक्षात कावळ्यांना घास भरविला जातो, परंतु अलीकडच्या केवळ शहरच नव्हे, तर गावांमध्येही कावळे दुर्मीळ झाल्यामुळे श्राद्धविधीनंतरचा घास भरविण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. पितृपक्ष आणि कावळे यांचा जवळचा संबंध असल्याने या काळात कावळ्यांचे दर्शन शुभ मानले जाते. घरावर कावळे आले, म्हणजे पितरांची आपल्यावर कृपा आहे, अशी जनमानसांत श्रद्धा आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने घराेघरी तिथीनुसार पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध झाल्यानंतर घराच्या छतावर कावळ्यांसाठी घास ठेवला जातो. कावळ्यांनी येऊन हा घास भक्षण केल्यास तो पितरांना प्राप्त होतो, अशी श्रद्धा असल्याने घरोघरी हा विधी केला जातो. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे विविध पक्ष्यांप्रमाणे शहरात कावळ्यांचेही दर्शन दुर्लभ झाल्याने तर्पणाला काकस्पर्श होण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी दाट वृक्षराजी आहे, अशा ठिकाणी घास नेऊन ठेवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड
शहरात झाडांची संख्या कमी असून, हवेतील प्रदूषणही अधिक आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचा अधिवासच नष्ट होत आहे. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे पिकांवरील अळ्या, कीटक नष्ट झाले आहेत. हेच कावळ्यांचे मुख्य खाद्य असल्याने सध्या कावळ्यांना मुबलक खाद्यच मिळत नाही. त्यामुळे हळूहळू कावळ्यांची संख्या कमी होत आहे.
अनेक पक्षी नामशेष
पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे केवळ कावळेच नव्हे, तर अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कावळ्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे, तर दुसरीकडे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नसाखळी प्रभावित झाली आहे. एकंदरीत जैवविविधता धोक्यात आली असली, तरी त्याकडे कुणाचे लक्ष नाही. पर्यावरणाकडे गंभीरतेने पाहिले जात नाही.
सर्वभक्षी असूनही कावळा गायब!
कावळा सर्वभक्षीय आहे. त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्यांची संख्या घटली, असे म्हणणे उचित ठरणार नाही. ‘स्वच्छतादूत’ म्हणून हा पक्षी परिचित आहे. पिकांवरील कीटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे; पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षीतज्ज्ञांसमोर आहे…
पितृ पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व
पितृ पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते. यंदा पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. यादरम्यान पितरांची पूजा केली जाते, याला श्राद्ध कर्मदेखील म्हणतात. श्राद्धविधी प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. श्राद्ध कर्म किंवा तर्पण शुद्ध आणि थंड चित्ताने केले तर पितरांना शांती मिळते. तसेच त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतात, असे मानले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात. असे मानले जाते की, पूर्वज निसर्गाशी संबंधित आहेत. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यासमोर नक्कीच येतात. अशा वेळी घरी येणारा प्राणी, पक्षी, गरीब-पीडित इत्यादींना मान द्या, त्यांना अजिबात निराश करू नका. चला जाणून घेऊया कोणत्या विविध रूपात पूर्वज घरी येऊ शकतात.
कावळा
पितृ पक्षाच्या वेळी घरात किंवा गच्चीवर आलेल्या कावळ्यांना काहीही खायला न देता हाकलून देऊ नका. कावळ्याला काही तृणधान्ये द्या. कावळ्यांना हाकलून दिल्यास पितरांना राग येऊ शकतो. यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पितृ पक्षातील १५ दिवस पितर कावळ्यांद्वारेच अन्न घेतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यामुळे त्यांच्या आत्म्याला समाधान मिळते. यासोबतच घरच्यांचाही आशीर्वाद मिळतो. घरामध्ये आनंद, शांती आणि सकारात्मकतेचा प्रवाह असतो.
कुत्रा-गाय
कुत्र्यांना यमाचे दूत मानले जाते. श्राद्ध पक्षादरम्यान पंचबली भोग दिला जातो. या भोगामध्ये कुत्रे आणि गायींच्या नावेही भोग अर्पण केला जातो. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात घरात गाय किंवा कुत्रा येत असेल तर ते शुभ मानले जाते. त्यांना अन्नधान्य किंवा काहीही खायला द्या. घराबाहेरही त्यांना पाहून आदर करा. पितृ पक्षात गाईची सेवा केल्याने पितरांना खूप आनंद होतो. ते सदैव तुम्हाला आशीर्वाद देतात.
गरीब-आवश्यक किंवा अज्ञानी
पितृपक्षात घरी येणारे पाहुणे, गरीब, असहाय्य इत्यादी लोकांना वाईट वागणूक देऊ नका. असे मानले जाते की, या काळात पितर कोणत्याही रूपात तुमच्या दारी येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा आदर करा. त्यांना खाण्या-पिण्याबरोबरच योग्य दक्षिणा द्या. त्यांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. ही परीक्षा पितरांच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले जाते.
हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला खूप महत्त्व आहे. पितृ पक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते, असे मानले जाते. पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान केले जाते. पितृ पक्षाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून होते आणि भाद्रपद अमावस्येला संपते. हिंदू धर्मामध्ये पितरांची पूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मृत्यूनंतर विसरू नये, म्हणून त्यांचे श्राद्ध करण्यासाठी विशेष प्रथा आहे. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबर शनिवार ते २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल. पितृ पक्षाचे महत्त्व हिंदू पुराणांमध्ये सविस्तर सांगितले आहे. जाणून घेऊया पितृ पक्षातील श्राद्धाच्या तारखा आणि त्यांचे महत्त्व.
श्राद्धाचे महत्त्व :
पितृ पक्षात लोक पितरांचे श्राद्ध करतात. पितृ पक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. धर्मग्रंथांनुसार पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी त्यांच्या पूर्वजांची पूजा केली पाहिजे. पितर प्रसन्न असतील तर देवही प्रसन्न होतात, असे मानले जाते. शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी श्राद्ध कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना तर्पण किंवा पिंडदान दिले नाही, तर पितरांच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही, असे मानले जाते. तसेच पितरांचे पिंडदान केले नाही तर त्यांचा आत्मा मृत्यूलोकात भटकत राहतो, अशीदेखील मान्यता आहे.
पितृपक्षात काय करावे…
– धर्मशास्त्रानुसार, पितृ पंधरवड्यात पिंडदान आणि ब्राह्मणभोजनाला महत्त्व आहे. दानधर्म करून पितरांचे श्राद्ध करावे.
– ब्राह्मण, पुरोहितांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुऊन त्यांना आसनावर बसवावे.
– ब्राह्मण भोजनाबरोबरच पंचबली भोजनाला विशेष महत्त्व आहे.
– पितरांना तर्पण करण्याचा अर्थ त्यांना पाणी देणे असा आहे.
– पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, कुश, अक्षता, फुले आणि काळे तीळ घेऊन त्यांना आमंत्रित करा.
– पितरांचे नाव घेत अंजलीचे पाणी ५-७ किंवा ११ वेळा पृथ्वीवर टाका. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जातात.
– पितृपक्षात कावळ्यांना खायला द्यावे.
पितृपक्षातील महालयाच्या तारखा
१० सप्टेंबर २०२२- प्रतिपदा महालय
११ सप्टेंबर २०२२ – द्वितीया महालय
१२ सप्टेंबर २०२२ – तृतीया महालय
१३ सप्टेंबर २०२२ – चतुर्थी महालय
१४ सप्टेंबर २०२२ – पंचमी महालय
१५ सप्टेंबर २०२२ – षष्ठी महालय
१६ सप्टेंबर २०२२ – सप्तमी महालय
१८ सप्टेंबर २०२२ – अष्टमी महालय
१९ सप्टेंबर २०२२ – नवमी महालय
२० सप्टेंबर २०२२ – दशमी महालय
२१ सप्टेंबर २०२२ – एकादशी महालय
२२ सप्टेंबर २०२२ – द्वादशी / संन्याशाचे महालय
२३ सप्टेंबर २०२२ – त्रयोदशी महालय
२४ सप्टेंबर २०२२ – चतुर्दशी महालय
२५ सप्टेंबर २०२२ – अमावस्या महालय,
सर्व पितृ अमावस्या, सर्व पितृ अमावस्या श्राद्ध,
महालय श्राद्ध