अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार? शिंदे गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले, “ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत त्यांनी…”

मुंबई | Deepak Kesarkar – गायरान जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी आणि सिल्लोड कृषी महोत्सवाच्या मुद्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात सोमवारी (26 डिसेंबर) विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठिशी घालणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“आरोप करणारे आरोप करत असतात. पण ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत त्यांनी यावर उत्तर देणार असल्याचं जाहीर केलंय. आज ते उत्तर देतील. आजचा दिवस सीमाभागाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांसंबधी आज बैठक बोलावली आहे. सीमाभागाला कोणत्याही परिस्थितीत न्याय दिला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. त्यामुळे काय सवलती देता येतील यावर विचार करुन त्यासंबंधीच्या घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील,” असं दीपक केसरकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “आजचं कामकाजाचं स्वरुप कसं असेल हे मी आत्ता सांगू शकणार नाही. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घोषणा करतील. कर्नाटक सरकारविरोधातील ठराव तर होणारच आहे, पण याशिवाय सीमाभागासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल देखील घोषणा मुख्यमंत्री करतील,” अशी माहितीही केसरकरांनी दिली.

पहिल्या दिवशीच ठराव व्हायला हवा होता अशी टीका विरोधक करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकर म्हणाले की, “ज्यांनी आधी काहीच केलंल नाही ते असं बोलू शकतात. सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव आम्ही करत नाही. सर्वांनी महाराष्ट्रासाठी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे”, असंही केसरकर म्हणाले.

Sumitra nalawade: