मुंबई | Devendra Fadnavis – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशा लोकांवर कारवाई करून काहीही फायदा नसतो. यापूर्वीही ते अनेक केसेस भोगत असून ते बेलवरच आहेत. अनेकवेळा कोर्टात हजर न राहील्यामुळे त्यांचं वाॅरंट निघतात. एवढंच आहे की ते जे खोटं बोलत आहेत त्याचं उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ. मला असं वाटतं की बहुदा प्रसारमाध्यमांकडून आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळावी. सुरूवातील त्यांच्या यात्रेला प्रसारमाध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत नव्हती. आता ती जास्त मिळावी म्हणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.”
“एकप्रकारे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सुरू आहे. मी एवढंच सांगतो की ते जे काही करत आहेत त्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून जर त्यांनी काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर त्यांनी काही केलं तर त्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. बाकी त्यांची यात्रा सुरू असून आम्ही त्यांना सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू पण महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये”, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.