मुंबई Ajit Pawar Irrigation Scam Case : भाजप नेते मोहित कांबोज (Mohit Kamboj) यांनी काल (१६ ऑगस्ट) केलेल्या ट्वीट्सने राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कांबोज यांनी ‘लवकरच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या भेटीला जाणार आहे’ अशाप्रकारचे काही ट्वीट केले. मात्र, त्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता असणारी व्यक्ती कोण आहे याबाबत खुलासा नाही. कांबोज यांनी एका ट्वीट मध्ये सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणात अजूनही पूर्णपणे क्लीनचीट मिळालेली नसल्याची माहिती आहे. २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीनचीट बाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अजून स्वीकारलेला नाही. त्यामुळे अजित पवारांना पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांच्या सिंचन घोटाळा प्रकरणातील क्लीनचीटबाबतचा अहवाल मुंबई हायकोर्टात प्रलंबित असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. वृत्तानुसार २०१९ मध्ये एसीबीने अजित पवारांना क्लीन चीट दिली होती. ती परमबीर सिंह यांनी दिली होती. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे हा अहवाल न्यायालयाकडून अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. अजित पवारांना या प्रकरणाला पुन्हा सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे मोहित कांबोज यांचे ट्वीट अजित पवारांकडेच बोट दाखवत असल्याची चर्चा आहे.