काँग्रेसनं बडतर्फ केल्यानंतर आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार? स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “फडणवीस-बावनकुळे माझ्या घरी…”

मुंबई | Ashish Deshmukh – काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानं आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्यावर ही कारवाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीनं केली आहे. तसंच आता काँग्रेसनं बडतर्फ केल्यानंतर देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

आशिष देशमुख पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत देशमुख यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की, गेल्या शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्या घरी नाश्त्यासाठी आले होते. ते माझ्या घरी आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माध्यमांनीच हे पेव उठवलं आहे.

काँग्रेस पक्षातून मला काढून टाकलं जाईल असं कधी वाटलंही नव्हतं. पण आता मी लोकांशी, कार्यकर्त्यांशी बोलून आणि जनतेचा कौल पाहून पुढचा निर्णय घेणार आहे. मी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी हरलो. तसंच 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा मी पराभव केला होता. तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात मी त्यांना कडवी झुंज दिली होती. मी आता जनतेशी बोलून माझी राजकीय भूमिका ठरवणार आहे.

Sumitra nalawade: