श्रीनिवास वारुंजीकर
भाषावार प्रांतरचनेने आपणच आपल्या प्रादेशिक भाषांचे महत्त्व कमी केले, हा आरोपच हास्यास्पद आहे. देशाची राष्ट्रभाषा कोणती आणि कोणती भाषा सर्वाधिक बोलली जाते, त्यावर राष्ट्रभाषा ठरवणे, हे दोन्हीही विषय मातृभाषेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनात गैरलागू आहेत.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला होता की, भाषा जपायची ती कायद्याने नव्हे; तर बोलणार्यांनी. शाळा-महाविद्यालयांतून मराठी भाषा सक्तीच्या संदर्भात त्यांनी असे म्हटले असले, तरीही भाषा जपण्यासाठी ती बोलणार्यांनी काय आणि किती प्रयत्न केले, याविषयी कुणीच बोलताना-लिहिताना दिसत नाही. आपण फक्त सरकारच्या नावाने खडे फोडायला रिकामे असतो. तीच गोष्ट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नाची आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या विषयात श्रेयवादच इतका उफाळून आला आहे की, आज तो प्रश्नच अडगळीत पडला आहे. त्याची ना कोणाला फिकीर, ना खंत!
अडला नारायण गरुडाचे पाय धरी सारख्या शब्दप्रयोगांमध्ये गरुड जाऊन गाढव कोणी आणले? प्रसंगी वाळूचे कण रगडिता तेलही गळे या प्रतिमेचा उपयोग सर्वार्थाने चुकीच्या पद्धतीने रूढ करण्याचे पाप कोणाचे? शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोलीभाषा, बोलभाषा, शहरी बोली, ग्रामीण बोली आणि प्रत्येक ठिकाणी होणारे व्याकरणाचे गोंधळ आजही आपण निस्तरलेले नाही आहेत, हे वास्तव नाकारून कसे चालेल? (ढेकर आला की आली?) अचूक मराठी शिकण्याबाबत-शिकवण्याबाबतच हे हाल असतील तर हडसून-खडसून विचार अशा शब्दप्रयोगांचे अर्थ कोण आणि कधी समजावून सांगणार? आजच्या पिढीला तर मराठीमध्ये सांगितलेला मोबाइल नंबरही समजत नाही. म्हणजे ८९ म्हणजे काय? ४३ कशाला म्हणतात? इतक्या साध्या आणि प्राथमिक पातळीवर आपण पालकांनी दुर्लक्ष केले आहे. भाषेचा मृत्यू हा केवळ भाषेचा मृत्यू नसतो. तो एका संस्कृतीचा मृत्यू असतो, हे खरे आहे. पण त्यासाठी भाषिक राज्यांना अंतर्गत बाबतीत पूर्ण स्वायत्तता देऊन युरोपियन युनियनसारखी भारतीय संघराज्याची निर्मिती करून आमच्या भाषा आणि आमचे ऐक्य दोन्ही अबाधित राखण्याचा प्रयत्न आत्मघाती ठरणारा असू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
इच्छाशक्ती दाखवली तर कोणतीही भारतीय भाषा टिकवणे अशक्य नाही. या इच्छाशक्तीचाच अभाव असल्याने आपण आपल्या (किंवा अन्य कोणत्याही (हिंदीखेरीज) भारतीय भाषेला) ज्ञानभाषा बनवू शकलेलो नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होण्यासाठीच आपल्या भाषेचा त्याग करून इंग्रजीचा अंगीकार केला आहे, हे केवळ अर्धसत्य आहे. वास्तव हे आहे की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या निमित्ताने झालेल्या देशव्यापी आंदोलनांवेळी ‘इंग्रजीमुळेच इंग्रजविरोधी भारतीय नागरिक एकत्र आले होते’. खंडप्राय अशा विशाल भारतभूमीचा (पाकिस्तान-बांगलादेशसह) राज्यशकट चालवणारे मूठभरच इंग्रज होते.