संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ घातल्याने लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत (दि. ११) तहकूब करण्यात आले आहे. विरोधी खासदारांनी विविध मुद्दे मांडण्याची मागणी केल्याने लोकसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर काही वेळातच उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू असल्याने राज्यसभेचे कामकाजही उद्या दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधींना नाटक करणे आणि पंतप्रधानांना शिवीगाळ करणे आवडते, परंतु ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांच्या प्रति इतर खासदारांची जबाबदारी आहे. त्यांना फक्त येथे नाटक करायचे आहे आणि मग परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करायची आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये रिजिजू यांनी संसदेबाहेर राहुल गांधींच्या निषेधाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, काँग्रेस नेते लोकांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही.