सोशल मीडियावरील प्रतिसादाने
पिंपरी : राज्यात सत्तांतराचे नाट्य घडल्यानंतर शिवसेनेचे दोन पक्ष निर्माण झाले आहेत. बाळासाहेंबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमुळे सोशल मीडियावर रणकंदन माजले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी उड्या घेतल्या आहेत. सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सोशल मीडियावरील प्रतिसादाच्या जोरावर निवडणूक जिंकता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपने बूथ पातळीवर काम सुरू केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष सध्या सोशल मीडियावर आरोपांचा धुरळा उडविण्यात व्यस्त आहेत. महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी प्रत्येक प्रभागात तीन अथवा चार सक्षम उमेदवार, मतांची गोळाबेरीज, वेगवेगळी समीकरणे सर्व काही साधावे लागते. सोशल मीडियावर किती जरी राळ उडविली तरी प्रभाग पातळीवर सक्षम चेहरा देता आला नाही, तर निवडणूक जिंकणे अवघड जाते. सत्तांतरानंतर मविआच्या घटक पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात सध्या तरी तशीच परिस्थिती दिसून येत आहे.
विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी पुन्हा हे विसरताना दिसत आहेत की चर्चेतही आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले जात आहोत. सध्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच सुरू आहेत. याचाच अर्थ की विरोधक म्हणून आवश्यक असणारा स्पेस देखील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस गमावत आहे. शहर पातळीवर विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कॉंग्रेस यांनी प्रभाग पातळीवर आपले उमेदवार निश्चित केलेले दिसत नाहीत.
कदाचित त्यांची यादी तयारही असावी, परंतु ज्या पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या इच्छुकांचे जनसंपर्क कार्यालय आणि काम दिसत आहे, तसे या दोन्ही पक्षांचे दिसत नाहीत. केवळ सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादावरच हे पक्ष अवलंबून आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील महापालिका निवडणुकांमधील पक्षांचे आकडे पाहिले असता विरोधी पक्षांची घसरण दिसून येत आहे. या घसरणीतून सावरण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर आरोप करणे हेच एक सूत्र अंगीकारले आहे.
पक्ष २०१२-२०१७
भाजप– ३ ७७
शिवसेना १४- ९
राष्ट्रवादी कॉंग्रेस ८३- ३६
कॉंग्रेस १४- ००
मनसे ४- ०१