Women’s IPL Bidders | बीसीसीआय (BCCI) आता महिलांची आयपीएल स्पर्धा (Women’s Premier League) खेळवणार आहे. नुकताच महिला आयपीएल 2023 (Women IPL 2023) या स्पर्धेसाठीच्या संघांचा लिलाव पूर्ण झाला आहे. तसंच महिला आयपीएल संघांची नावं देखील समोर आली आहेत. अशातच जगातले तिसरे आणि भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) हे आयपीएल संघ खरेदीत अव्वल ठरले आहेत. गौतम अदाणी यांनी अहमदाबादचा (Ahmedabad) संघ खरेदी केला आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद संघ हा भारतातला सर्वात महागडा संघ ठरला आहे.
नुकतंच महिला आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार विकले गेले आहेत. तसंच मागच्या आठवड्यात माध्यम अधिकारांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर आज महिला संघांचा लिलाव करण्यात आला आहे. यंदाच्या महिला आयपीएलच्या पहिल्या पर्वात एकूण 5 संघ सहभागी होतील. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ आणि दिल्ली या संघाचा समावेश आहे. या सर्व संघांसाठी शेकडो कोटी रुपयांची बोली लागली आहे. तसंच यामध्ये अहमदाबाद हा संघ सर्वात महागडासंघ ठरला आहे तर लखनौच्या संघासाठी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स कंपनीनं सर्वात कमी 757 कोटी रुपये मोजले आहेत.
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, अदाणी स्पोर्ट्सलाईन ग्रुपनं अहमदाबादचा महिला आयपीएल संघ 1289 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. तर स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडनं बंगळुरूचा संघ रॉयल चॅलेंजर्स 901 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. तसंच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडनं मुंबईचा संघ खरेदी करण्यासाठी 912.99 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली आहे. जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं दिल्लीचा संघ 810 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केला आहे. तर कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडनं लखनौ संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत.